नवी दिल्ली : भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. धोनी मात्र अजूनही आयपीएल खेळतो. धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जर्सी क्रमांक ‘०७’ निवृत्त करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी हा धोनीबद्दल आदर दाखवणारा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, बीसीसीआयचा हा निर्णय धोनीबद्दल आदर दाखवण्यासारखा आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीने क्रिकेटपटू म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सात क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. या पैलूवर भाष्य करताना ते म्हणाले की, सात क्रमांकाची जर्सी ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्याशी जोडली गेली होती. त्यामुळे आता त्याचा ब्रँड इतर कोणी वापरत असल्यास तो ब्रँड खराब होणार नाही याची काळजी घेणे हा एक चांगला निर्णय आहे. याचे कौतुक करायला हवे, असे ते म्हणाले.