मुंबई : महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महत्वाकांक्षी योजना पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होतात. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्याची धास्ती अनेक महिलांचा मनात आहे. दरम्यान ज्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे अशांना यापूढे या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी दिली.
लाडकी बहीण योजने मधून ५ लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची संख्या २.४६ कोटी होती तर जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा २.४१ कोटी इतका होता. मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबद्दल सरकारकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची घोषणा झाल्यानंतर जुलै ते जिसेंबर या कालावधीत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात एकूण ४५० कोटी रुपये ट्रान्स्फर झाले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही रक्कम परत घेण्यात आलेली नाही आणि तसे करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. ज्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे त्यांना पुढील लाभ मिळणार नाहीत, परंतु आधीच जमा केलेली रक्कम काढणे योग्य होणार नाही, असेही तटकरे यांनी नमूद केले.
महिलांना सशक्त करण्याचे लक्ष्य
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुमारे २.३ लाख महिलांना लाभ मिळत होता, ज्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले असे अधिका-याने सांगितले. लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आली होती. महिलांना आर्थिकदृष्टया सशक्त करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विधासभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात या योजनेचा सिंहाचा वाटा आहे.
पात्रता निकष काय?
महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार, २१-६५ वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होतात. लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा या योजनेच्या अटीत समावेश होतो.
विरोधकांकडून हल्लाबोल
नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने २३० जागा जिंकल्या. ही निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आलो तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, या योजनेवर विरोधकांकडून सातत्याने हल्लाबोल करण्यात आला.