32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरअवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

अवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरीत्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवैध पाणी उपसा करणा-यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी येथे दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती होती.

जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांची पथके गठित करण्यात आली आहेत.

पाण्याचा वापर काटकसरीने करावा…
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा अवैध उपसा करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणीही पाण्याचा अवैध पद्धतीने उपसा करू नये. तसेच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
या पथकांनी गतिमान कार्यवाही करून जिल्ह्यात होणारा अवैध पाणी उपसा रोखावा, अशा सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केल्या. उपलब्ध पाणीसाठा, चारा, तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांना पाण्याबाबत सूचना केल्या.

भरारी पथकामार्फत कारवाई
जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आलेल्या पाणीसाठ्याचा उपसा करणा-यांवर भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत ८६ विद्युतपंप जप्त करण्यात आले आहेत.
१३८ विद्युत स्टार्टर, १०९ वायर बंडल जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८७५ वीज कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR