इंफाळ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला उद्यापासून (ता. १४) मणिपूरमधून प्रारंभ होतो आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच राहुल गांधी हे थेट पुन्हा जनतेच्या दारात जात असल्याने काँग्रेसने यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. मणिपूरमधील इंफाळ ऐवजी यात्रा थौबुल मधून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, जीवनावश््यक वस्तूंची भाववाढ आणि सामाजिक न्याय हे मुद्दे लावून धरण्यात येतील. राहुल यांच्या या दुस-या टप्प्यातील न्याय यात्रेचा १५ राज्यांतून प्रवास होईल तसेच १०० लोकसभा मतदारसंघांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतील.
एकीकडे २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने देशभर आक्रमक प्रचार सुरू केला असतानाच काँग्रेसने मात्र सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या रोजी-रोटीच्या प्रश्नावर आक्रमक लढा उभारण्याचे संकेत दिले आहेत.
पोलिस प्रशासनाने या यात्रेसाठी फक्त १ हजार लोकांना परवानगी दिली होती मात्र यात्रेला जास्त लोक येणार असल्याने ठिकाण बदलण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. आता इंफाळ पासून ३४ किमी दूर असलेल्या थौबुल या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.