नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांचे कल हाती आले आहेत. बहुतेक एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजप आणि मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे भाकित वर्तवले होते. पण एक्झिट पोलचे हे भाकित खोटे ठरताना दिसले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत भाजपचीच सत्ता आली आहे. तर काही एक्झिट पोलचा आकडा खरा ठरताना दिसत आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांत काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसची सत्ता येईल असेच वातावरण होते. त्यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोषही करण्यात येत होता. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तसतसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला आहे. या कलांनाच कलाटणी मिळाली आहे.
चारपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांतील कलांमध्ये भाजप सत्तेवर आले आहे. तर काँग्रेस केवळ तेलंगणा या एका राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सत्ता असलेले मोठे राज्य गमावण्याची वेळही काँग्रेसवर आली आहे.
सध्याच्या कलानुसार मध्य प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता आली आहे. भाजपने मध्य प्रदेशात बंपर विजय मिळविला आहे. कलानुसार राज्यात २३० जागांपैकी भाजप १६२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६५ जागा तर इतर ३. मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवराजसिंह चौहान यांनी शेवटच्या टप्प्यात राज्यात ‘लाडली योजना’ लागू केली. त्याचा फायदा असंख्य लोकांना झाला. त्यामुळेच लोकांनी पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसकडून राजस्थान गेले
राजस्थानातून काँग्रेसची सत्ता गेलेली दिसत आहे. राजस्थानात भाजप विजयी झाला आहे. राजस्थानात एकणू १९९ जागांपैकी भाजपला ११२ तर काँग्रेसला ७० जागा मिळताना दिसत आहेत. इतरांचा १७ जागांवर विजय होताना दिसत आहे. काँग्रेसचा राजस्थानातील हा सर्वांत मोठा आणि नामुष्कीकारक पराभव असल्याचे दिसत आहे. हातात सत्ता असूनही काँग्रेसला राज्य राखता आलेले दिसत नाही.
काँग्रेसचे छत्तीसगडचेही स्वप्न भंगले
दरम्यान, सकाळी छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर होती. त्यामुळे काँग्रेसची छत्तीसगडमध्ये सत्ता येईल असेच बोलले जात होते. पण हा अंदाजही फोल ठरला आहे. छत्तीसगडमध्ये ९० पैकी ५३ जागांवर कूच केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला ५३ तर काँग्रेसला ३४ आणि इतरांनी ३ जागा मिळविल्या आहेत.
तेलंगणाने दिलासा दिला
तेलंगणात मात्र काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेलंगणात ११९ जागांपैकी काँग्रेसला ६६ तर सत्ताधारी बीआरएस पार्टीला अवघ्या ३९ जागा मिळाल्या आहेत. भाजपला मात्र केवळ ९ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमला ५ जागांवर आघाडी दिसत आहे.