नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर साऊथच्या अन्नपूर्णी या सिनेमामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. या सिनेतील प्रमुख अभिनेत्री नयनतारा हिच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी घालावी, अशी मागणी तेलंगाणातील भाजपचे नेते टी राजा यांनी केली आहे.
टी राजा म्हणाले, “नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओवर एक सिनेमा येत आहे अन्नपूर्णी. हा सिनेमा बनवणारे दिग्दर्शक निलेश कृष्णा आणि याची निर्मिती केली आहे झी स्टुडिओनं. या सिनेमाची कथा अशी आहे की, एका पुजा-याची मुलगी एका मुस्लिम तरुणाशी प्रेम करते ज्याचं नाव फरहान दाखवण्यात आलं आहे.
काय आहे वाद?
“यामध्ये हिंदू तरुणी मुस्लिम तरुणाशी प्रेम करते आणि तिला कुराण पठण करायला लावलं जातं. तसेच बिर्याणी बनवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. तसेच हा हिरो तरुणीला म्हणतो की भगवान रामानंच मांसाहार केला आहे तर तुला खायला काय अडचण आहे, अशी या सिनेमाची कथा आहे. या प्रकरणी झी स्टुडिओनं माफी देखील मागितली आहे. पण माफी मागितल्यानं काही होणार नाही. कारण अनेकदा आपण पाहिलं आहे की ंिहदुंच्या भावनांशी खेळ केला जातो. लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे सिनेमे बनवले जातात” असंही टी राजा यांनी म्हटलं आहे.