पुणे : पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. जितेंद्र सुरेश सातव या राष्ट्रवादी पक्षाच्या वैद्यकीय मदत केंद्राच्या प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे. सोबतच दुस-या एका कार्यक्रमात पोलिस कर्मचा-यालाही मारहाण केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एका उद्घाटन कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्यासमोरच हा प्रसंग घडला आहे.
ससून रुग्णालयात उद्घाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले, त्यांना राग अनावर आला. याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली.दरम्यान, याबाबत जितेंद्र सातव यांना विचारण्यात आले, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. याबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देईन, असे ते म्हणाले.
पोलिस शिपायाच्याही कानशिलात लगावली
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे पुणे कँटोन्मेंट आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस शिपायाला कानशिलात लगावली. शिवाजी सरक असे या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. कांबळे यांनी मंचावरून खाली उतरत असताना पोलिस कर्मचा-याला मारहाण केली आहे. या प्रकारामुळे सर्वजण अवाक् झाले. दरम्यान सुनील कांबळे यांनी केलेली मारहाणीची दिवसभरातील ही दुसरी घटना होती.
या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते व या मान्यवरांच्या समोर अशी घटना घडल्याने अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.