22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप खासदार उन्मेश पाटील बुधवारी ठाकरे गटात

भाजप खासदार उन्मेश पाटील बुधवारी ठाकरे गटात

मुंबई : प्रतिनिधी
जागावाटप व उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांत नाराजीचे पेव फुटले असून फोडाफोडीत चॅम्पियन असलेल्या भाजपलाही फुटीची लागण झाली आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले जळगावातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महायुतीत प्रवेश केला; पण आता उलटा प्रवाहही सुरू झाला आहे. आ. निलेश लंके यांच्या पाठोपाठ महायुतीचा आणखी एक मोठा नेता उद्या बाहेर पडणार आहे. भाजपने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकिट कापून त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. आपल्याला उमेदवारी नाकारल्याने पाटील पक्षाच्या नेत्यांवर नाराज होते. त्यामुळे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला आहे. आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते, या आशेवर उन्मेश पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करून मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत. त्या दृष्टीकोनातून पाटील यांनी मंगळवारी संजय राऊत यांची मुंबईत भेट घेऊन पक्षप्रवेशाचा मुहुर्त निश्चित केला; परंतु पाटील यांना जळगावातून ठाकरे गटाच्या तिकिटावर लोकसभेची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR