मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण लावून धरणा-या आ. सुरेश धस यांना तोंडघशी पाडून त्यांची नाचक्की केल्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सुरेश धस यांना शांत रहा, असे भाजपने कधीही सांगितले नाही. भाजप त्यांच्या पाठीशी आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी उपयोग होईल. कुटुंबियांना अधिक चांगला न्याय मिळू शकेल असा दावा बावनकुळे यांनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण सातत्याने लावून धरून वाल्मीक कराड यांच्याविरुद्ध आघाडी उघडणा-या सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचीही कोंडी केली होती. परंतु बाहेर आक्रमक भूमिका घेणा-या धस यांनी मागच्या आठवड्यात दोन वेळा धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी तब्बल चार तास त्यांची गुप्त बैठक झाल्याची बातमी फुटल्याने खळबळ उडाली होती.
सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने व सुरेश धस यांनी अशी भेट झाल्याचा इन्कार केला. पण बावनकुळे यांनी भेट झाल्याचे मान्य केल्यानंतर दोघांनाही, विशेषत: सुरेश धस यांना तोंडघशी पडावे लागले होते. बावनकुळे यांनी आपल्या निवासस्थानी या दोघांनाही बोलावून समेटाचे प्रयत्न केले होते हे स्पष्ट झाल्यावर दुटप्पी भूमिका घेणा-या सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी आज पुन्हा पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांना शांत रहा, असे भाजपने कधीही सांगितलेले नाही. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठबळच दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या कारवाया झाल्या आहेत, ज्या चौकशीबाबत सुरेश धस यांनी मागणी केली आहे, त्या सर्व फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून देखील पूर्ण पाठबळ सुरेश धस यांच्या पाठीमागे आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, ही आमची भूमिका असल्याची सारवासारव बावनकुळे यांनी केली. सुरेश धस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पडत आहे. सुरेश धस योग्य पद्धतीने प्रकरण हाताळत आहेत. त्यांना कोणते आदेश देण्याचे काहीही कारण नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीचे शिक्षा येईपर्यंत सुरेश धस प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, मात्र तपास यंत्रणा आपला तपास करतील. अजित पवारांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ते निर्णय घेतील असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.