मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. विधानसभा निवडणुकीतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी, एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत. या जागांतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काम करावे लागेल. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, आमदार राजेश राठोड, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, विविध राज्यांत आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले. या वेळी मोदींनी संविधानाला नमन केले. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवायला निघाले आहेत. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकास कामे होत नाहीत फक्त लुट सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही भाजपात प्रवेश देऊन पवित्र केले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जनगणनेची भूमिका मांडली. बहुजनांचा आर्थिक, सामाजिक शैक्षणिक सर्व्हे केला तरच न्याय मिळेल; पण भाजपा व मोदी सरकारचा मात्र जनगणनेला विरोध आहे. यूपीए सरकारने आणलेल्या महिला आरक्षणाला भाजपाने विरोध केला होता आणि तेच विधेयक भाजपाने मंजूर केले; पण त्याची अंमलबजावणी केली नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी न करून केंद्रातील भाजपा सरकारकडून लाडक्या बहिणींवर अन्याय केला आहे आणि राज्यात मात्र लाडकी बहीण असा दुजाभाव भाजपा करीत आहे. विधानसभेला महायुती १०० जागाही जिंकू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत महाराष्ट्रातून भाजपा युती सरकार गेले की दिल्लीतील सरकारही कोलमडेल आणि जनगणना करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
या वेळी राजेश लिलोठीया म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीला ४०० जागा जिंकून संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला होता; परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षणाचा संकल्प हाती घेतला व भाजपाचा हा डाव जनतेने हाणून पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रक्षणाचे काम काँग्रेस व इंडिया आघाडीने केले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ९९ जागी विजय मिळला त्यात ३७ जागा एससी, एसटी समाजाच्या आहेत. विधानसभेला एससी विभागातील पदाधिका-यांचा विचार करावा. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करा, असे आवाहनही लिलोठीया म्हणाले.