24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरकरमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा

करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा

करमाळा : शहरातील दत्त पेठ येथे नगरपालिकेच्या नळ कनेक्शनला दूषित पाणी येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली होती. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या ठेकेदाराकरवी दत्तपेठेतील महामुनी कॉम्प्लेक्ससमोर खड्डा खोदून पाइपलाइन सोडवली असता या पाइपमधून गटारीतील गाळयुक्त काळ्या पाण्याचा अक्षरशः पाट वाहिला. हा प्रकार पाहून येथील रहिवाशांनी आपण इतके दिवस अशा प्रकारचे दूषित पाणी पीत होतो, असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले.

करमाळा नगरपालिकेच्या – पाणीपुरवठा योजनेचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे. दहिगाव येथील तांत्रिक बिघाड, मुख्य जलस्रोतापासून नगरपालिकेच्या मौलालीचा माळ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या पाइपलाइनमध्ये बिघाड, जल शुद्धीकरण केंद्रातील त्रुटी, शहरात येणाऱ्या आणिगल्लीबोळांतील पाइपलाइनमधील बिघाड आणि या पाइपलाइनमधील लीकेजमुळे नळाला येणारे दूषित पाणी, यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, या विस्कळीत पाणीपुरवठा योजनेत सुधारणा होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दत्तपेठ येथे सुभाष चौकातून आलेल्या या पाइपलाइनवर बरेचसे नळसंयोजन असून, गेल्या महिन्यापासून या नागरिकांची दूषित पाणी येत असल्याबाबत तक्रार होती. यापूर्वीही असेच दूषित पाणी येत असल्यामुळे येथे खड्डा खोदून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, यावेळी हाच प्रकार घडत असल्याने नेमका घोटाळा कुठे आहे, हे शोधण्यासाठी याठिकाणी पुन्हा आउटलेट बसवण्यात आले असून, या भागात पाणी सोडण्यात आल्यानंतर नळाला शुद्ध पाणी येते, की अशुद्ध, याची पडताळणी होणार असल्याचे सांगण्यात आले. या अशुद्ध पाणी पुरवठ्याबाबत मांढरे यांनी तक्रार केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR