मुंबई : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणा-या व्यक्तीच्या विरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. धमकी देणा-या व्यक्तीने त्याचे नाव पवन असल्याचे सांगितले होते. ताडदेव पोलिस आता पुढील तपास करत आहेत.
हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात एक धमकीचा फोन आला. फोन करणा-या व्यक्तीने हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्यास सांगितले. दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्ब स्फोट केला जाईल. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा फोन हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयीन फोनवर आला होता. तसेच आरोपीने फोनवर स्वत:चे नाव पवन असे सांगत अर्वाच्च शिवीगाळ करत दर्ग्याविषयी वादग्रस्त वक्तव्यही केली. या प्रकरणी हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणा-या व्यक्ती विरोधात कलम ३५१(२), ३५२, ३५३(२), ३५३(३), भादंवि २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहेत.
धमकी देणा-या व्यक्तीने हा फोन का केला होता, त्याच्या मागे काय हेतू होता याचा तपास पोलिस करत आहेत. हा फोन करणारा व्यक्ती हा कुणीतरी मानसिक रुग्ण असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.