नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांना सातत्याने बॉम्बच्या धमक्या येत आहेत. आजदेखील किमान ५० प्रवासी विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांमध्येच नाही, तर प्रवाशांमध्येही विमान प्रवासाबाबत भीती निर्माण झाली आहे. तसेच, या धमक्यांमुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १४ दिवसांत विविध भारतीय विमान कंपन्यांच्या ३५० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. यातील बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज इंडिगोच्या १८, आकासा एअरच्या १५ आणि विस्ताराला १७ विमानांना बॉम्बच्या धमक्याही मिळाल्या. पण, कसून तपासणी केल्यानंतर सर्वा विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितले की, केंद्र सरकार या धोक्यांना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी, कायदा अंमलबजावणी संस्था आणि इंटेलिजन्स ब्युरोची मदत घेत आहे. नागरी विमान वाहतूक कायद्यात दोन बदल करण्याची योजना आहे. प्रथमत: अशा प्रकारच्या धमक्या देणा-यांना कठोरात कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला जाईल. दुसरे म्हणजे, अशा लोकांना विमान प्रवास करण्यास बंदी घालण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. याचीही घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल.