28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयमोकळा श्वास!

मोकळा श्वास!

मागच्या सतरा दिवसांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात कोंडल्या गेलेल्या ४१ मजुरांचे श्वास अखेर मंगळवारी रात्री मोकळे झाले. बचाव पथकाने सर्वच्या सर्व ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात यश प्राप्त केल्याने अवघ्या देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. साहजिकच मजुरांच्या कुटुंबीयांसह, नातेवाईक, आप्तेष्ट यांनीच नव्हे तर या मजुरांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रार्थना करीत असलेल्या अवघ्या देशाने दिवाळीनंतरच्या दिवाळीच्या जल्लोषाचा अनुभव घेतला. मागचे १७ दिवस या मजुरांच्या जीवनाची लढाई अक्षरश: आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावत होती. मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नरत बचाव पथक रात्रंदिवस कार्यरत होते. सुटकेसाठीचे वेगवेगळे प्रयोग केले जात होते. प्रयत्नांना अपयश आल्यावरची निराशा दूर करून नव्याने प्रयत्नांची जिद्द दाखविली जात होती. मजुरांचे प्राण वाचवायचेच, त्यांची सुखरूप सुटका करायचीच याच जिद्दीने बचाव कार्यात सहभागी प्रत्येक जण पछाडलेला होता.

अखेर या जिद्दीनेच मृत्यूला हरवले व मृत्यूच्या डोंगरदाढेतून या ४१ जिवांची सुटका केली. एवढ्या दीर्घ काळ अविरत बचावकार्य हाती घेऊन ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्याची देशातील ही पहिलीच यशस्वी मोहीम ठरावी. ‘अंत भला तो सब भला’ या उक्तीप्रमाणे आता मजुरांच्या सुटकेवर आनंद व्यक्त होत असला तरी मागच्या १७ दिवसांत या ४१ मजुरांनी व त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या बचाव पथकातील प्रत्येक सदस्याने प्रत्येक क्षणाला केलेला संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. या प्रसंगात अतुलनीय धैर्य व संयम दाखविणा-या ४१ मजुरांचेही बचाव पथकाइतकेच कौतुक करायला हवे. या बचाव मोहिमेतील अडचणी व अडथळ्यांनी संपूर्ण देशालाही या मोहिमेच्या काठिण्य पातळीची जाणीव करून दिली होती. त्यामुळे केवळ मजुरांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्टच नव्हे तर या मजुरांची साधी ओळखही नसणारे देशभरातील आबालवृद्ध मजुरांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रार्थना करीत होते. या संकटाच्या निमित्ताने बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या व त्यांना सुखरूप सोडविण्यासाठी प्रयत्नरत बचाव पथकाच्या पाठीशी अवघा देश एकवटला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या बचाव मोहिमेसाठी युद्धपातळीवर सर्व यंत्रणा उभारणा-या सरकारचेही तत्परतेबद्दल व संवेदनशीलतेबद्दल कौतुक करायलाच हवे. मागच्या १७ दिवसांत मजुरांच्या सुटकेसाठी हरत-हेने प्रयत्न केले गेले पण त्यात अपयश आले. सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्र सामग्री आणि ‘ऑगर’सारखे अद्ययावत मशिनही अपयशी ठरले. बोगद्याच्या वरूनही खोदकाम सुरू करण्यात आले होते. मात्र ज्या पद्धतीवर देशात बंदी घालण्यात आली आहे त्या ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीनेच बचाव पथकाला मजुरांपर्यंत पोहोचविले व त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश प्राप्त झाले. ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीत कुशल असलेल्या कामगारांनीच अखेर या ४१ मजुरांचे प्राण वाचविले. ‘ऑगर’चे मोडलेले पाते बाहेर काढल्यावर ‘रॅट-होल मायनिंग’च्या १२ कामगारांच्या पथकाने हाताने बोगद्यात कोसळलेला ढिगारा काढण्यास व मलब्यातून पाईप टाकण्यासाठी खोदकाम करण्यास सुरुवात केली. संपूर्ण रात्रभर हे खोदकाम मानवी मदतीनेच सुरू होते.

त्यातून ८०० मिलीमीटर व्यासाचा पाईप टाकून अडकून पडलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यात बचाव पथकाला यश आले. जवळपास दोन मीटरचे खोदकाम रॅट-होल मायनिंग पथकातील कामगारांनी आपल्या हातानेच पार पाडले. ८०० मिलिमीटर व्यासाच्या पाईपमधून ट्रॉली स्ट्रेचरचा वापर करून एक-एक करीत सर्व ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्या वेळी झालेला जल्लोष मोहिमेची व्याप्ती व यश अधोरेखित करणाराच होता. साहजिकच त्याने देशाच्या पंतप्रधानांना व राष्ट्रपतींनाही भावूक केले. ‘‘उत्तरकाशीमध्ये आपल्या कामगारबंधूंच्या बचाव मोहिमेचे यश प्रत्येकाला भावूक करणारे आहे. बोगद्यात जे सहकारी फसले होते त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमचे साहस आणि धैर्य प्रत्येकाला प्रेरित करीत आहे. एवढ्या दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर आपले हे सर्व सहकारी त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत, ही अत्यंत समाधानाचीच बाब आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी अशा आव्हानात्मक समयी संयम व साहस दाखविले. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

मी या बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व लोकांच्या भावनेला सलाम करतो’’, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेच्या यशावर आपल्या भावना व्यक्त केल्या तर बचाव मोहीम यशस्वी करणा-यांना देशाचा सलाम आहे, या शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हीच देशातल्या प्रत्येकाची भावना आहे. या बचाव मोहिमेचे हिरो ठरले ते अरनॉल्ड डिक्स! ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ असलेल्या अरनॉल्ड डिक्स यांना भारत सरकारने या बचाव मोहिमेचे सल्लागार म्हणून विशेष पाचारण केले होते. त्यांनी दिवस-रात्र बोगद्याच्या बाहेर बचाव मोहिमेत कार्यरत पथकातील सदस्यांसोबत घालविले. ‘सिलक्यारा बोगद्यातील ऑपरेशन हे माझ्यासाठी आतापर्यंतचे सर्वांत कठीण ऑपरेशन होते. ते केवळ तांत्रिक कारणासाठीच नव्हे तर त्यात असलेल्या धोक्यांमुळे कठीण होते. अडकलेला प्रत्येक मजूर सुखरूप बाहेर पडेल यासाठी हे ऑपरेशन होते’, अशी प्रतिक्रिया अरनॉल्ड डिक्स यांनी दिली.

डिक्स यांच्यासोबत या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आयएस अधिकारी नीरज खैरवाल, बोगदातज्ज्ञ ख्रिस कपूर व निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन हेही या मोहिमेचे शिलेदार ठरले. सर्वांच्या एकत्रित व अविरत प्रयत्नांमधून १७ दिवसांपासून बोगद्यात कोंडलेला ४१ जिवांचा श्वास अखेर मंगळवारी मोकळा झाला. एका अर्थाने हा या ४१ जिवांचा पुनर्जन्मच आहे! ही बचाव मोहीम म्हणजे अनेक यंत्रणांनी राबविलेला सुव्यवस्थित प्रयत्न होता, जो सर्वांत लक्षणीय बचावकार्यांपैकी एक होता, ही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया या मोहिमेचे यथार्थ व योग्य वर्णन करणारीच आहे. १७ दिवस ४१ जिवांच्या श्वासांसाठी सुरू असलेली झुंज सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी यशस्वी ठरली व ४१ जिवांचा श्वास मोकळा झाला याहून आनंद तो दुसरा कोणता?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR