19.9 C
Latur
Friday, January 30, 2026
Homeराष्ट्रीयबीएसएफचा सीमेवर गोळीबार

बीएसएफचा सीमेवर गोळीबार

पाकचा मोठा कट उधळला फाजिल्का आणि अमृतसरमध्ये शस्त्रास्त्रांसह ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली : कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा फायदा घेऊन भारतीय सीमेत घुसखोरी करणा-या पाकिस्तानी तस्करांचे मनसुबे सीमा सुरक्षा दलाने मातीस मिळवले आहेत. पंजाबच्या फाजिल्का आणि अमृतसर सीमेवर राबवलेल्या मोठ्या मोहिमेत सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणि कोट्यवधी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान एका घुसखोराला कंठस्रान घालण्यात यश आले आहे.

फाजिल्का जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीओपी जी-जी-३ परिसरात गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानी तस्करांच्या हालचाली दिसल्या. हे तस्कर दोन मोठ्या बॅगांमधून शस्त्रे आणि ड्रग्जची खेप भारतात पाठवण्याच्या तयारीत होते. सतर्क बीएसएफ जवानांनी त्यांना पाहताच जोरदार गोळीबार सुरू केला. जवानांनी तब्बल ६० राउंड फायरिंग केल्यामुळे तस्कर घाबरून अंधाराचा फायदा घेत पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले.

काय काय सापडले?
सर्च ऑपरेशनमध्ये जवानांच्या हाती परदेशी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लागला आहे. यामध्ये ११ ग्लॉक, ५ जिगाना, ३ नॉरिंको आणि १ बरेटा अशा एकूण २० पिस्तुल आहेत. ३९ मॅगझिन, १ गन आणि ३१० जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच २ किलो १६० ग्रॅम हेरॉईन ताब्यात घेण्यात आले आहे.

अमृतसरमध्ये ४० किलो हेरॉईन आणि हँड ग्रेनेड जप्त
दुसरीकडे अमृतसरच्या राजासांसी भागातील ओठियां गावाजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानातून पाठवण्यात आलेले ४० किलो हेरॉईन आणि ४ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही तरुण मोटारसायकलवरून ही खेप घेऊन जात होते, मात्र गावकरी आणि रस्ते कामगारांनी अडवल्यामुळे ते मोटारसायकल सोडून पसार झाले.

गुरदासपूरमध्ये घुसखोर ठार
गुरदासपूरच्या बीओपी धनिया भागात कडाक्याच्या थंडीत भारतीय सीमा ओलांडून आत शिरणा-या पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफच्या ११३ बटालियनने कंठस्रान घातले. वारंवार इशारा देऊनही तो मागे न फिरल्याने जवानांनी गोळीबार केला, ज्यामध्ये तो जागीच ठार झाला.

ऑपरेशन सेलने जाळे केले उद्ध्वस्त
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी या मोहिमेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने संयुक्तपणे हे जाळे उद्ध्वस्त केले असून आता या तस्करीच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR