लखनौ : लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपाला मोठा धक्का बसला आहे. बसपाचे आंबेडकरनगरचे खासदार रितेश पांडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसपाचा राजीनामा दिल्यानंतर पांडे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात होते. ते खरे ठरले असून, खासदार पांडे यांनी रविवारी बसपा प्रमुख मायावती यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
बसपा प्रमुख मायावती यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ब-याच दिवसांपासून त्यांना पक्षाच्या बैठकीला बोलावले जात नाही किंवा पक्षाकडून त्यांच्याशी कोणताही संवाद होत नाही. तसेच मी तुमच्याशी आणि वरिष्ठ अधिका-यांशी बोलण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते फोल ठरले. यामुळे पक्षाला आता माझ्या कामाची गरज नाही. यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. पक्षापासून दूर होण्याचा निर्णय अवघड जरी असला तरी आता दुसरा पर्याय नाही, असे खासदार पांडे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.
स्वार्थासाठी लोक इकडेतिकडे भटकतात : मायावती
दरम्यान, खासदार रितेश पांडेने पक्ष सोडण्याच्या निर्णयावर बसपाप्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मायावतींनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, तुम्ही बसपाचे नियम पाळले का, तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले आहे का, तुम्ही तुमचा सगळा वेळ आपल्या मतदारसंघात घालवला का, पक्षाच्या सूचनांचे पालन केले का, अशा वेळी तुम्हाला पुन्हा खासदारकीचे तिकिट देणे शक्य आहे का? असा प्रश्नांचा भडिमार करून मायावती यांनी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी इकडेतिकडे भटकताना दिसत राहतील असा पांडे यांचे नाव न घेता टोला लगावला.