प्रयागराज : माफिया अतिक अहमदच्या मृत्यूनंतर त्याच्या अवैध संपत्तीच्या विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अतिकची अवैध संपत्ती आणि त्याच्या टोळीच्या काळ्या कमाईकडे सरकारने मोर्चा वळवला असून प्रयागराज पोलिसांनी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा छडा लावला आहे.
ग्रेटर नोएडाच्या सेक्टर ३६च्या ए ब्लॉकमध्ये १०७ व्या क्रमांकावर माफिया अतिक अहमदची मालमत्ता आहे. एखाद्या हवेलीसारखा त्याचा हा बंगला आहे. त्याची किंमत सुमारे ४.४ कोटी इतकी आहे. अतिकच्या घराचे नाव मन्नत असे आहे.
प्रयागराजचे पोलिस कमिशनर रमित शर्मा यांनी अतिक अहमदचा मन्नत बंगला गँगस्टर कायद्यांतर्गत संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. कलम १४ (१) नुसार जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांचं एक पथक ग्रेटर नोएडा येथे जाऊन मन्नत बंगला ताब्यात घेणार आहे.
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या धर्तीवर अतिकने त्याच्या कोठीचं नाव मन्नत ठेवलं होतं. आता तो बंगला जप्त होणार आहे.
पोलिसांना तपासादरम्यान मन्नत बंगल्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. या काळात प्रशासन, विकास प्राधिकरण, बँक यांचीही मदत घेण्यात आली. प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि दोघांवर गोळीबार केल्यानंतर माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम काही काळ या मन्नत कोठीत वास्तव्याला असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरात आधीच पैसे लपवून ठेवल्याचा संशय आहे. असद आणि गुलाम हे दोघे ग्रेटर नोएडा येथील या घरात केवळ पैसे गोळा करण्यासाठी गेले होते, असेही तपासामध्ये पुढे आलेले आहे.