पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या बेसुमार फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये आगीच्या घटनांत मोठी वाढ झाली. रविवारी (दि. ८) दुपारी ३ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अवघ्या १६ तासांच्या कालावधीत अग्निशमन दलाकडे आगीच्या तब्बल ९४ वर्द्या (कॉल) नोंदवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रत्येक घटनास्थळी तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही.
फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटनांची सुरुवात रविवारी दुपारी ३:१४ वाजता कोंढवा येथील कडनगर चौकातील एका पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला लागलेल्या आगीने झाली. त्यानंतर सायंकाळनंतर फटाक्यांची आतषबाजी वाढताच आगीच्या घटनांची मालिका सुरू झाली. सायंकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत सर्वाधिक आगी लागल्याचे समोर आले आहे.
शहरातील शिवाजीनगर, सदाशिव पेठ, कोथरूड, नाना पेठ, भवानी पेठ, कात्रज, धायरी, सिंहगड रस्ता, वारजे, येरवडा, खराडी, विमान नगर, बाणेर, पाषाण, हडपसर आणि धानोरी अशा प्रमुख भागांसह उपनगरांमध्ये आगीच्या घटना घडल्या. यामध्ये इमारतींचे फ्लॅट्स, गॅलरी, घरांचे छप्पर, मोकळ्या मैदानातील गवत, कचरा, झाडे, दुकाने, वाहने, गोडाऊन आणि अगदी उसाच्या गु-हाळालाही फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.
रात्रभर शहराच्या कानाकोप-यातून एकापाठोपाठ एक मदतीचे फोन येत राहिल्याने अग्निशमन नियंत्रण कक्ष आणि मैदानावर तैनात जवानांची प्रचंड धावपळ उडाली. जवानांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या प्रतिसादामुळे अनेक ठिकाणी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले, ज्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. नागरिक आणि प्रशासनाने मात्र सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्याची चर्चा शहरात आहे.
















