38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजरांगे पाटील यांचे पुन्हा बेमुदत उपोषण

जरांगे पाटील यांचे पुन्हा बेमुदत उपोषण

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आज अखेर सरकारला दिलेला इशारा मनोज जरांगे यांनी पूर्ण केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज सुरू केलेल्या आंदोलनात मनोज जरांगे यांनी अन्न पाणी आणि उपचारही घेणार नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

या आमरण उपोषणात मनोज जरांगे यांनी अन्नत्याग आणि पाणीत्याग करणार असल्याचा दावा त्यांनी केला. औषध उपचारसुद्धा घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. दोन दिवसात विशेष अधिवेशन सरकारने घेऊन हा कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे आमरण उपोषण असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या सत्रात मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ परत घ्यावे, माझ्या उपोषणादरम्यान मला राज्य मंत्रिमंडळातील ६ ते ७ मंत्री भेटण्यासाठी आले होते. माझे उपोषण ज्यावेळी त्यांनी सोडले, त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता की राज्यातील मराठा आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही तात्काळ मागे घेऊ. पण अद्यापपर्यंत ते गुन्हेसुद्धा मागे घेण्यात आले नाहीत. राज्यात ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या मराठा बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारने द्यावीत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भुजबळांवरही टीका केली.

माझ्यावर हल्ला केला होता
माझ्यावरसुद्धा किल्ल्यावर हल्ला करण्यात आला होता. पण ती बातमी मी समोर येऊ दिली नाही. पण आता शेवटी मला ते सांगावे लागत आहे. गड किल्ल्यावर मी दर्शनासाठी गेलो असता त्या ठिकाणी माझ्या गाडीवर ट्रक टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी आम्हाला बाहेर काढले. मग आम्ही सुद्धा सुरक्षा द्यावी, अशी मागणी करायला पाहिजे होती. पण आम्ही तशी मागणी केली नाही. कारण आम्ही मर्द मराठे आहोत,असे जरांगे म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR