अलिगड : अलीगड जिल्ह्यात पोलिसांनी स्थानिक व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी हिंदू महासभेच्या एका पदाधिका-याला अटक केली आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने शनिवारी ही माहिती दिली असून पोलिसांच्या मते, जिल्ह्यातील रोरावर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व्यावसायिक अभिषेक गुप्ता याच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड असलेल्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पूजा शकुन पांडे उर्फ महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती यांना शुक्रवारी रात्री उशिरा राजस्थानच्या भरतपुर जिल्ह्यातील आगरा-जयपूर महामार्गावरील लोधा बायपास येथून अटक करण्यात आले आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुरुंगात पाठवण्यात आले.
एकेकाळी धर्म आणि साधनेच्या गप्पा मारणारी ही महिला आता प्रेम, वेड आणि हत्येच्या कथेत मुख्य आरोपी बनली आहे. पूजा शकुन पांडे यांनी आपल्यापेक्षा बरेच वर्षे लहान असलेल्या अभिषेक गुप्ताशी अभ्यासाच्या बहाण्याने घरी भेटीगाठी सुरू केल्या. हळूहळू हे नाते अध्यात्माच्या मर्यादेतून बाहेर पडून अवैध संबंधात बदलले. अभिषेक हा एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुण होता, ज्याची टीव्हीएस मोटार एजन्सी होती. पूजा त्याच्यावर पूर्णपणे मोहित झाली होती. ती केवळ त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकू लागली नाही, तर त्याच्या एजन्सीमध्ये निरर्थक भागीदारीची मागणीही करू लागली.
जेव्हा अभिषेक पूजाच्या या हट्टामुळे त्रस्त होऊन तिच्यापासून अंतर ठेवू लागला, तेव्हा ही कहाणी धोकादायक वळणावर गेली. त्याने पूजाचा नंबर डिलीट केला, सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण पूजा शकुन पांडेचा राग आता वेडात बदलला होता. तिने आपल्या पती अशोक पांडे यांच्यासोबत मिळून अभिषेकला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला.
अलीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) नीरज कुमार यांनी अटकेची पुष्टी करत सांगितले की, पूजा शकुन यांच्यावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होते. २६ सप्टेंबरच्या रात्री व्यावसायिक अभिषेक गुप्ता याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती, त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिषेकचे वडील आणि भाच्यासोबत बसमध्ये चढत होता, तेव्हा अचानक दोन सशस्त्र व्यक्तींनी गोळीबार सुरू केला. गोळी लागल्याने जखमी झालेल्या अभिषेक गुप्ता यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एसएसपी यांनी सांगितले की, अभिषेकच्या वडिलांनी अशोक पांडे आणि त्यांच्या पत्नी पूजा शकुन पांडे यांच्यावर पैशांच्या व्यवहाराच्या वादातून हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.