34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपत्नीला ‘सेकंड हँड’ म्हणणे पडले महागात

पत्नीला ‘सेकंड हँड’ म्हणणे पडले महागात

मुंबई :
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नीला तीन कोटींची भरपाई तसेच दरमहा दीड लाख रुपयांची भरपाई देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने पतीला दणका दिला. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यासह नेपाळमध्ये हनिमूनदरम्यान ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवले होते.

न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पतीचे अपील फेटाळले. कौटुंबिक हिंसाचारामुळे पत्नीच्या आत्मसन्मानाला धक्का बसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाने पत्नीसाठी पर्यायी घराची व्यवस्था करण्याचे आदेश पतीला दिले होते. याचवेळी तिला पतीकडून दरमहा घरभाडे म्हणून ७५ हजार रुपये तसेच तीन कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि दीड लाख रुपयांची पोटगी मंजूर केली होती.

पतीने या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे अपील फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तथापि, पतीने १९९४ मध्ये लग्न झाल्यापासून २०१७ पर्यंत सातत्याने पत्नीचा मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळ केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून सरळसरळ स्पष्ट होते. या छळाला पंटाळून पत्नीला नऊ वर्षे माहेरी राहावे लागले. या काळात पतीने तिला दैनंदिन खर्चासाठी पैसे देण्याचीही जबाबदारी सांभाळली नाही हे कनिष्ठ न्यायालयाने काढलेले निष्कर्ष योग्यच आहेत, असे मत व्यक्त करीत न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पतीची याचिका फेटाळली. या प्रकरणात अ‍ॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी ‘अ‍ॅमिकस क्युरी’ म्हणून न्यायालयाला सहाय्य केले.

न्यायालयाचे निरीक्षण
पतीने १९९४ ते २०१७ या कालावधीत पत्नीच्या बाबतीत सतत कौटुंबिक हिंसाचाराची कृत्ये केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होते. भारत आणि अमेरिकेत दोन्ही ठिकाणी पत्नीचा छळ केल्याचे दिसून येते. कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत आर्थिक शोषणाचाही एक पैलू आहे. पीडित विवाहितेला स्त्रीधनापासून वंचित ठेवणे हादेखील एक प्रकारचा छळ आहे. पतीने तातडीने बँक लॉकरमध्ये ठेवलेले स्त्रीधन अर्थात पत्नीचे दागिने पत्नीला परत करावेत.
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात भरपाई ठरवताना त्या-त्या प्रकरणानुसार निकष भिन्न असू शकतात. विवाहितेवर कौटुंबिक हिंसाचाराच्या कृत्यांचा झालेला प्रभाव हा प्रमुख घटक आहे.

संशयातून पत्नीला मारझोड
मुंबईत १९९४ मध्ये लग्न झाल्यानंतर दाम्पत्य अमेरिकेत गेले होते. तेथे सुरुवातीच्या काळातच पतीने त्याच्या भावाशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. याच संशयातून मारझोड आणि मानसिक छळ सुरू केला. मुंबईत परतल्यानंतरही दूधवाला व भाजीवाल्याशी विवाहबा संबंध असल्याचा संशय पतीने घेतला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR