18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज

सरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई : प्रतिनिधी
माहिम मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आज (दि. २९) अर्ज दाखल केला. अमित ठाकरे यांचा निवडणूकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. मात्र सरवणकर निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. आज त्यांनी अर्ज दाखल केल्याने माहिममध्ये शिंदे गटाकडून सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विभागप्रमुख महेश सावंत यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

अमित ठाकरे हे प्रथमच निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विजयासाठी महायुतीने पाठिंबा द्यायला हवा, अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली होती. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची शिवतिर्थावर भेट घेतल्यानंतर सरवणकर हे निवडणूकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले.

सरवणकर यांनी माघार घेऊ नये यासाठी विभागातील शिवसैनिकांनी दादर येथील शाखेसमोर येऊन सरवणकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सरवणकर यांनी माघार घेऊ नये, असा आग्रह त्यांनी धरला. त्याचवेळी शिवसैनिकांना आश्वस्त करताना सरवणकर यांनी आपल्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिला असून त्यांनी निवडणूक लढण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगितले होते.

सरवणकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या अधिकृत ‘एक्स’ या समाजमाध्यमावर मी उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. चला होऊया ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार, असे आवाहन केले होते. मात्र आज सकाळी सरवणकर कोणालाही न सांगता अर्ज भरून आले. सकाळी ९ वाजता ते रॅलीमध्ये सहभागी होणार होते. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्ते प्रभादेवी शाखेत जमले होते. रॅलीचं नियोजन करूनही ते न आल्याने काहीवेळ सभ्रम निर्माण झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR