जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटीतील घडामोडींना आता वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या सक्रिय मराठा आंदोलक महिला ललिता तारख यांना सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली होती.
दुसरीकडे, सहका-यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे बोलताना मनोज जरांगे यांनी भावुक होत आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून माझ्या सोबत राहणा-यांवर केसेस आणि चौकशांचा ससेमिरा लावला जात आहे असा संताप व्यक्त केला.
नेमके काय आहे प्रकरण?
आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय सहभागी असलेल्या ललिता तारख यांनी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या काही राजकीय व सामाजिक भूमिकांवर उघडपणे प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर पद्धतशीरपणे बदनामीची मोहीम सुरू झाली. ललिता तारख यांचा चेहरा एआय डीपफेक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रांवर, व्हीडीओंवर लावून ते फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर पसरवण्यात आले.
कुटुंबाला धमक्या आणि मानसिक छळ
सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट्स करण्याव्यतिरिक्त निनावी फोन कॉल्सवरून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. तारख यांनी केवळ कारवाईचीच मागणी केली नाही, तर २०२३ पासून आंदोलनाच्या नावाखाली कोणी किती संपत्ती कमावली, याची माझ्यासह सर्वांची सखोल चौकशी व्हावी अशी थेट मागणीही तपास यंत्रणांकडे केली आहे.
५ जणांची नावे निष्पन्न, पाच ते सहा अज्ञात
ललिता तारख यांनी यापूर्वी दोन वेळा पोलिसांत धाव घेतली होती. अखेर त्यांनी सादर केलेले संशयित सोशल मीडिया प्रोफाइल्स, कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि धमकीच्या ऑडिओ कॉल्सचे तांत्रिक पुरावे तपासून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजेस चालवणा-यांचा समावेश असून, पाच प्रमुख आरोपींची नावे समोर आली आहेत. भगवानराव जाधव, डी. ए. उंबरे पाटील, विभीषण लिंबाजी नन्नावरे, बळीराम मोरे, संतोष पाटील राहटीकर. तसेच, इतर ५ ते ६ अज्ञात सोशल मीडिया वापरकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या लेकराबाळांनी ३०० रुपयांसाठी मजुरी केली : मनोज जरांगे भावुक
समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि आयकर-ईडी चौकशीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी साठेवाडी (गेवराई) येथे अत्यंत भावनिक शब्दांत आपली बाजू मांडली. मी महिना महिना उपोषणाला बसलो, तेव्हा माझ्या घरात खायला भाजी नव्हती. नाव मोठे झाले म्हणून कोणाकडे हात पसरणार? मी घरात नसताना माझ्या पत्नीने आणि लेकरांनी ३०० रुपयांच्या रोजंदारीसाठी लोकांच्या शेतातील बांधावर कामाला जायचे. या सर्व हालअपेष्टा मनोज जरांगेने समाजाच्या लेकराबाळांसाठी सहन केल्या आहेत.
















