नांदेड : विशेष प्रतिनिधी
राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिका-यांच्या प्रशासकीय बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. त्यामध्ये नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांचीदेखील बदली झाली. त्यांच्या जागेवर शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली होती. महावरकर यांचा नांदेड येथील कार्यकाळ पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी यासंदर्भात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली आहे. याबाबत १९ जुलै रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश कॅटने दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर यांना येऊन जवळपास १६ महिने पूर्ण झाले. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ अजूनही शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. एखाद्या अधिका-याची बदली झाल्यानंतर किमान दोन ते अडिच वर्षे त्या अधिका-याची बदली करता येत नसल्याचे संकेत प्रशासनात असल्याचे सांगितले जाते. परंतु महावरकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची बदली झाल्यामुळे ते कॅटमध्ये गेले आहेत. प्रशासकीय कारणावरून बदली असली तरी कार्यकाळ पूर्ण करणे आवश्यक असते, असेही बोलल्या जात आहे.
महावरकर यांच्या अपिलावर सुनावणीसाठी कॅट ने १९ जुलै रोजीची तारीख दिली आहे. तोपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात येऊ नये, असे आदेशही देण्यात आले असल्याचे कळते. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानंतर समोरच्या अधिका-याला रुजू होता येते की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात असली तरी शहाजी उमाप हे नांदेडात दाखल झाले आहेत. उमाप यांच्याशी बातचित केली असता सदरील आदेश आधीच मिळाले असते तर कदाचित मी आलो नसतो. येथे आल्यानंतर आदेश कळाले आहेत. त्यामुळे आता १९ तारखेपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदलीचे नाट्य मात्र चांगलेच गाजले. आता पोलीस विभागाला १९ जुलै रोजी केंद्रीय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण काय निकाल देणार याकडे चारही जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.