मुंबई : प्रतिनिधी
आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विरोधकांनी पाय-यांवर आंदोलनाला सुरुवात केली. चद्दर लगी फटने, खैरात लगी बंटने, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यावेळी विरोधकांच्या हातात विविध पोस्टर दिसून आले. तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट. प्रत्यक्षात निधींची वानवा, वरून खैरातीचा गारवा. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हातात विठ्ठल-रुखुमाईची मूर्ती होती.
दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पाय-यांवर विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. सुरुवातीला सत्ताधारी पक्षांकडून विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन करण्यात आले. किस्सा कुर्सी का? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्रातून टीका करण्यात आली. एक आघाडी बारा भानगडी, गांव बसा नही लुटेरे आ गए, अशा जोरदार घोषणा सत्ताधा-यांकडून देण्यात आल्या. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.
काल (दि. २८) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. विरोधकांनी अर्थासंकल्पावरून सत्ताधा-यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधा-यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
भास्कर जाधवांची भरत गोगावलेंवर टीका
यानंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भरत गोगावलेंचा खरपूस समाचार घेतला. महायुतीत बारा भानगडी आहेत. हे गोगावले पाय-यांवर उभे राहून सांगत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते. हे सांगण्याचा प्रयत्न गोगावले करत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.