पुणे : महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट दिला आहे. त्याचवेळी काही भागांत गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. तसेच मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याच्या अंदाज शनिवार दि. २६ एप्रिल रोजी हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा सुरू आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशाच्या वर आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ अंशावर पोहचले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना २७ एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी दिला आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना २८ एप्रिलला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
नागपुरात गेल्या चार दिवसांपासून पारा ४४ अंशावर आहे. वातावरणातील कोरडेपणामुळे उन्हाची तीव्रता अधिक आहे. २६ ते २९ एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात एक किंवा दोन अंशाची घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपुरात ४५.४ आणि अकोल्यात ४५.१ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविण्यात आले.
विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. तसेच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यात पारा ४२ वर
मराठवाड्यातील तापमानाचा पारा देखील ४२ ते ४३ अंशावर गेला. उन्हामुळे राज्यातील धरणामधील जलसाठा कमी होत आहे. मराठवाड्यातल्या सर्व लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. मराठवाड्यातील १४२ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सोलापूरात अवकाळी
सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.