अमरावती : कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या वकील सुंकारा कृष्णमूर्ती यांनी माध्यमांना ही माहिती दिली. तेलुगू देसम पक्षाचे प्रवक्ते के पट्टाभी राम म्हणाले की, उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला. चंद्राबाबू नायडू यांची आज सुटका होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्राबाबू नायडू यांची प्रकृती खालावली होती आणि डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास आणि प्रचार कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने नियमित जामीन याचिकेसाठी १० नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. आंध्र प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. यावरून टीडीपी समर्थक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमकही झाली.
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेवरून टीडीपी नेत्यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या सरकारचा निषेध केला. चंद्राबाबू नायडू यांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. कथित कौशल्य विकास घोटाळ्यात त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांच्या सीआयडीने अटक केली होती. नायडू २०१४ ते २०१९ दरम्यान ते मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.