पुणे : प्रतिनिधी
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा पुण्यामध्ये म्युझिक कॉन्सर्ट होणार आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये आज संध्याकाळी दिलजीत दोसांझचा लाईव्ह शो होणार आहे. कोथरूड परिसरातील काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होणार आहे. पण या कॉन्सर्टला भाजपचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील, स्थानिक रहिवाशांनी आणि मनसेने विरोध केला आहे. यासाठीच शो होणा-या मैदानाच्या बाहेर स्थानिकांनी आंदोलन केले.
दिलजीत दोसांझच्या लाईव्ह शोला विरोध करत स्थानिक नागरिकांनी आज आंदोलन केले. ‘सेव्ह कोथरूड’ असे फलक स्थानिक नागरिकांनी झळकावत काळ्या फिती बांधत हा शो होऊ नये अशी मागणी केली. या शोमध्ये मद्यविक्री देखील केली जाणार असून यामध्ये विक्रीला इथे परवानगी कशी दिली जाते असा सवाल देखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
या कार्यक्रमासाठी कमीत कमी ८०-१०० स्पीकरच्या भिंती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे तेथील वयोवृध्द नागरिकांना याचा त्रास होईल म्हणून आम्ही या शोला विरोध करत असल्याचे इथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितल्े. तर विजयाच्या दुस-याच दिवशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हाती धुरा घेतली आहे.