इस्लामाबाद : पाकिस्तान पुन्हा एकदा पेटले आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानी सैन्य लोकांच्या घरात घुसून गोळीबार करत आहे. ड्रोनचा हल्ला करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत तीन लोक ठार झाले आहेत. १८ लोक जखमी झाले आहेत. ही घटना रावळकोटच्या उमर फारुख चौकातील आहे. पाकिस्तानी सैनिक आज पहाटे ५ वाजल्यापासूनच या परिसरात फायरिंग करत आहेत. त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला असून पाकिस्तानी नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत.
स्थानिक नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मी आम्हाला जाणूनबुजून टार्गेट करत आहे. नागरिकांच्या घरावर हल्ले सुरू आहेत. निशस्त्र आंदोलकांना टार्गेट केले जात आहे असा आरोप या नागरिकांनी केला आहे. पाकिस्तानमधील ही काही एकमेव घटना नाही. जून २०२६ मध्ये निदर्शने सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये १५३ नागरिकांना मारून टाकण्यात आले आहे. पीओकेतून आलेल्या या व्हीडीओत लोकांच्या घरांना आग लागलेली दिसत आहे. तसेच घटनास्थळीवरील शार्पनेलही लोक दाखवत आहेत. पाकिस्तानी सैन्याने आमच्या डेथ वॉरंटवर सही केल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
मुनीरच्या विरोधात लढायला
दुस-या एका व्हीडीओत सातत्याने गोळीबार होत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने रावळकोटमध्ये नागरिक आणि मुलांवर गोळीबार केला आहे. पण जनता मुनीर यांच्या नेतृत्त्वातील सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा निर्धारच या नागरिकांनी व्यक्त केला आहे.
केवळ पीठ आणि वीज नको
रिपोर्टनुसार, रावळकोटमध्ये सरकारी मोबाईल सेवा आणि इंटरनेट बंद करण्यात आले आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आपला विरोध व्यक्त करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना केवळ वीज आणि पीठ नको. तर त्यांना विधानसभा आणि स्थानिक संस्थांमध्ये प्रतिनिधीत्त्व हवे आहे. तसेच प्रशासनात स्वायतत्ता हवी आहे. त्यासाठीच त्यांचा लढा सुरू आहे.
















