पुणे : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहेत तर भुजबळांचा याला विरोध आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील इंदापुरात शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहून मार्दर्शन करणार आहेत. दरम्यान इंदापुरातील या मेळाव्याआधीच मंत्री छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
इंदापूरातील मेळाव्याची पूर्ण तयारी झाली आहे. या मेळाव्याआधीच पुण्यातील इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. भुजबळांच्या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे बॅनर लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.