नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे, या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आता पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. साधारणपणे अर्धातास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींशी सिंधू पाणी कराराच्या स्थगितीसंदर्भात आणि त्याच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले होते. आमचे राजकारण एवढे संकुचित नाही की, या संकटाच्या काळात आम्ही सरकारकडे संपूर्ण राज्याचा दर्जा मागू. तत्पूर्वी, जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काही दिवसांपूर्वी आम्ही या सभागृहात भेटलो होतो, तेव्हा अर्थसंकल्पासह काही इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली होती. तेव्हा आपण अशा परिस्थिती भेटू असे कुणालाही वाटले नव्हते. या हल्ल्याने आम्हाला अंत:करणापासून हादरवून टाकले आहे. मी त्या नौदल अधिका-याच्या विधवा पत्नीला काय उत्तर देऊ, आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहणा-या त्या मुलाला काय उत्तर देऊ, असा प्रश्न मला पडला आहे.
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले होते, मागच्या २६ वर्षांमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरमधील लोकांना कुठल्याही हल्ल्यानंतर अशा प्रकारे घराबाहेर पडताना पाहिले आहे. कठुआपासून श्रीनगरपर्यंत लोक घराबाहेर आले आणि त्यांनी काश्मिरींना असे हल्ले नको आहेत, असे सांगितले. हे माझे शब्द नाहीत तर हे प्रत्येक काश्मिरी नागरिकाचे शब्द आहेत. या देशातील कुठल्याही विधानसभा किंवा संसदेपेक्षा जम्मू काश्मीर विधानसभा पहलगाममध्ये झालेल्या २६ लोकांच्या मृत्यूचे दु:ख अधिक समजते. तुमच्यासमोर असे लोक आहेत. ज्यांच्यापैकी कुणी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. तर कुणी आपले वडील, कुणी आपले काका गमावले आहेत. आपल्यापैकी अनेक सहकारी असे आहेत ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांचं दु:ख या विधानसभेपेक्षा अधिक कुणाला समजू शकत नाही, अशा शब्दात ओमर अब्दुल्ला यांनी आपली भावना व्यक्त केली होती.