उज्जैन : उद्योगपती किंवा राजकीय लोकांकडे होणा-या लग्नांची चर्चा जोरदार असते. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मुलाचे लग्न पार पडले ते ही शेतक-याच्या मुलीशी. या लग्नास फक्त २०० जणांची उपस्थिती होती.
मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव याचे लग्न मध्य प्रदेशातील हरदा येथील शेतकरी सतीश यादव यांच्या कन्या शालिनीसोबत पार पडले. २४ फेब्रुवारी रोजी शालिनी यादव यांनी वैभवसोबत सप्तपदी पूर्ण केली. अगदी साध्या पद्धतीने हा समारंभ पार पडला.
लग्नात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मोजके राजकीय व्यक्ती होते. त्यात वधू पक्षाकडून ६० तर वर पक्षाकडून १४० जण होते.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव भाजप लॉ सेलचे जिल्हा सहसंयोजक आहेत. यापूर्वी ते अभाविपमध्ये सहमंत्री होते. शालिनी यादव यांचे वडील सतीश यादव हरदा येथे शेतकरी आहेत. शालिनीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. २३ फेब्रुवारी रोजी उज्जैन येथील डॉ. मोहन यादव यांच्या घरी हळदी मेहंदी सोहळा झाला. २४ फेब्रुवारीला पुष्करमध्ये लग्नाचा सोहळा पार पडला.