22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमहागाईला लसणाची फोडणी

महागाईला लसणाची फोडणी

गेल्यावर्षीपेक्षा भाव आता दुप्पट, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्यावर्षीअखेर लसणाने दरवाढीचा कळस गाठला होता. त्यानंतर लसणाचे भाव खाली आले. पण आता लसणाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे महागाईला लसणाची पण फोडणी बसणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा भाव दुप्पट झाले आहेत. गेल्यावर्षीच्या अखेरीस लसणाने दरवाढीत मोठी झेप घेतली होती. टोमॅटो, कांदा आणि बटाट्यांनी गेले वर्ष गाजवले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तर दरवाढीचा भडका उडाला होता.

त्यानंतर लसणाने मोठी घोडदौड केल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता पावसाळ्याच्या तोंडावर लसणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महागाईला लसणाची फोडणी बसली आहे. नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये लसणाला २०० ते २१० रुपये किलो भाव आहे. गेल्या वर्षअखेरीस लसणाच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा भाव दुप्पट
गतवर्षी जूनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच भाव २०० ते २१० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसणाचा हंगाम सुरू होतो. जूनपर्यंत लसणाचे दर घसरत असतात. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसूण तेजीत आहे. राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये ८० ते २३० रुपये किलोपर्यंत दर आहे. मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत.

लसणाच्या दरवाढीचे कारण काय?
लसणाचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडला आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता इतर भाजीपाला महागल्यास ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. केंद्र सरकारला याविषयी लवकर पाऊलं टाकावी लागणार आहेत. देशात महागाईचा आलेख चढाच राहिला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण लहरी हवामानाने सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

डिसेंबरमध्ये ४०० रुपयांचा भाव
डिसेंबर २०२३ मध्ये लसणाने मोठा भाव खाल्ला होता. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका त्यावेळी बसला होता. दिवाळीनंतर लसणाचा भाव ३५०-४०० रुपये किलोंच्या घरात पोहोचला होता. त्यानंतर या जानेवारीत आवक वाढल्यानंतर या किमती कमी झाल्या होत्या. आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा किमतींनी हिसका दाखवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR