39 C
Latur
Friday, May 31, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या ४ विद्यमान खासदारांना नारळ?

मुख्यमंत्री शिंदेंच्या ४ विद्यमान खासदारांना नारळ?

कोल्हापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. भाजपने ३२ ते ३७ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. त्यात शिंदेंच्या शिवसेनेला केवळ १० ते ११ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ ३ ते ४ जागाच मिळणार आहेत. त्यातच जागा तुमच्या आणि उमेदवार आमचे या या रणनीतीत शिंदे गटाच्या ४ विद्यमान खासदारांना नारळ मिळू शकतो. त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक, बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेत एकूण १३ विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांनी भाजपकडे २२ जागांची मागणी केली होती. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे यांना १० ते ११ जागा मिळतील, असे सांगितले. त्यामुळे शिंदे यांची अडचण झाली. आता त्यांनी किमान विद्यमान खासदार असलेल्या १३ जागा द्याव्यात, अशी मागणी भाजपकडे केली. मात्र, भाजप अजूनही १० ते ११ जागाच शिंदे गटाला देण्याची शक्यता आहे. यासोबतच जागा तुमच्या उमेदवार आमच्या या योजनेखाली शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या ४ जागांवर भाजप आपले उमेदवार मैदानात उतरविणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे यांना अनेक विद्यमान खासदारांची नाराजी ओढवून घ्यावी लागू शकते. यातून शिंदेंच्या शिवसेनेत असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

जागा तुमच्या, उमेदवार आमचे या अंतर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांसह नाशिक आणि बुलडाण्यातही भाजप आपले उमेदवार मैदानात उतरवू शकते. कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक तर हातकणंगलेत धैर्यशील माने हे खासदार आहेत. तसेच नाशिक आणि बुलडाण्यातही अनुक्रमे हेमंत गोडसे आणि प्रताप जाधव हे विद्यमान खासदार आहेत. तिथेही भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबत ठाण्यात शिंदे गटाचा खासदार नसला, तरी ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ती जागा भाजपने बळकावल्यास शिंदेंसाठी तोदेखील धक्काच आहे.

भाजपने अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला देत कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची मागणी शिंदेंकडे केली आहे. यासाठी शिंदेंवर दबाव वाढविला असल्याचे समजते. पण मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या मागणीबद्दल सकारात्मक नाहीत. विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. पण भाजपने कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला असल्याचे समजते. त्यासाठी पर्यायी उमेदवारही सूचवले आहेत. त्यात कोल्हापूर लोकसभेसाठी समरजीतसिंह घाटगे, धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. घाटगे भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत तर महाडिक भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.

हातकणंगलेत विनय कोरे?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत सेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा पराभव केला. पण येथेही भाजपने अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत उमेदवार बदलण्याची मागणी केली. या ठिकाणी भाजपने जनुसराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. शिंदे विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्याच्या भूमिकेत असताना भाजपने त्यांच्यावर उमेदवार बदलण्यासाठी दबाव वाढविला आहे.

ठाणे, नाशिक, बुलडाण्यात भाजपच उमेदवार देणार?
कोल्हापूर, हातकणंगलेसह ठाणे, नाशिक, बुलढाण्यातही उमेदवार बदलण्याची मागणी भाजपने केली आहे. नाशिक, बुलढाण्यात सेनेचे खासदार आहेत. त्यांचा पत्ता कापण्यात यावा, असा भाजपचा आग्रह आहे. भाजपच्या या मागण्यांवर शिंदे काय भूमिका घेणार आणि भाजपकडून येणारा दबाव कसा हाताळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR