नवी दिल्ली : केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने भारतात चार वर्षांखालील मुलांना सर्दी आणि खोकल्याचे एकत्रित औषध देण्यास बंदी घातली आहे. या संदर्भातील इशारा केंद्र सरकारच्या औषधनियंत्रण कंपनीने भारतातील फार्मास्युटिकल कंपन्यांना दिला आहे. या बंदीनुसार कफसिरफच्या पॅकेजिंगला लेबल लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताच्या औषध नियामकने (डीसीजीआय) चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी, खोकला आणि तापावर सिरप वापरण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भातील सूचना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने सोमवारी १८ डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून दिल्या आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेने, क्लोरफेनिरामाइन मैलेट आणि फेनिलेफ्रिन ही दोन औषधे एकत्र करूव तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे.
मैलेट आणि फेनिलेफ्रिन या दोन औषधांच्या मिश्रणातून तयार केलेले सिरप किंवा गोळ्या सामान्य सर्दीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात; पण काही दिवसांपूर्वी या सिरपच्या वापरामुळे जगभरात १४१ मुलांचा मृत्यू झाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही औषधांचा वापर करून तयार केलेल्या सिरपचे लेबलिंग तात्काळ अद्ययावत करण्याच्या सूचना केंद्राने सर्व औषध कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.