पुणे : देशातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तर, काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट असणार आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. गारठा, दाट धुके यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.
गेल्या चार दिवसांपासून राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. या हिवाळ्याच्या हंगामातील नीचांकी किमान तापमान रविवारी नोंदवण्यात आले. तापमानात आणखी घसरण झाल्याने राष्ट्रीय राजधानीत धुके आणि थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. दरम्यान, कमी दृश्यमानता आणि प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचले आहे.
विमानतळावर शून्य दृश्यमानता
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे ५ वाजता शून्य दृश्यमानतेची नोंद करण्यात आली. भारतीय रेल्वेने रविवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानी आणि इतर अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे दिल्लीकडे जाणा-या २२ गाड्या एक ते सहा तास उशिराने धावल्या.
विक्रमी किमान तापमानाची नोंद
रविवारी दिल्लीचे किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हिवाळ्यातले सर्वात कमी तापमान आहे. कमाल तापमान 20.6 अंश सेल्सिअस होते, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा एक अंश जास्त आहे. शनिवारी किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 4 अंशांनी कमी होते.