29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयतीव्र धुक्यामुळे पुण्याहून १० विमाने रद्द

तीव्र धुक्यामुळे पुण्याहून १० विमाने रद्द

धुक्यांचा परिणाम विमान, रेल्वे प्रवासावर 

पुणे: दिल्लीत तीव्र धुक्यामुळे निर्माण झालेल्या खराब हवामानाचा फटका पुण्यातील विमान प्रवाशांना बसला. रविवारी दिल्लीहून पुण्याला येणा-या विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत. त्यामुळे पुण्याहून नऊ विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, तर येथून दिल्लीला जाणा-या एका विमानाला आठ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

रविवारी पुणे, दिल्लीसह देशातील अन्य शहरांची विमानसेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीत रविवारी सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने उड्डाणांना फटका बसला. परिणामी विमानसेवा देणा-या विविध कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली.

रद्द करावी लागलेली नऊपैकी पैकी पाच विमाने दिल्लीसाठी होती, तर इतर चार विमाने चेन्नई, प्रयागराज, अहमदाबाद व नागपूर या शहरांसाठी होती. मात्र दिल्लीहून विमाने आलीच नाहीत. परिणामी या शहरांसाठीची उड्डाणे रद्द करावी लागली. सुरवातीला विमान कंपन्या विमानाला उशीर होणार असल्याची घोषणा करीत असल्याने प्रवासी वाट पाहत बसून राहिले. परिणामी टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत राहिली. मात्र दुपारनंतर विमाने रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

आठ तासांचा उशीर

पुण्याहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी झेपावणार होते. मात्र त्यास तब्बल आठ तासांचा उशीर झाला. अखेर दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी ते झेपावले. प्रवासी आठ तासांपेक्षा जास्त वेळ टर्मिनलवर बसून राहिले. संबंधित विमान कंपनी व विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना खाद्यपदार्थांची पाकिटे दिली.

दिल्लीत धुक्यामुळे कमी दृश्यमानता निर्माण झाली. परिणामी पुण्याला येणारी विमाने रद्द करण्यात आली. जे प्रवासी टर्मिनलमध्ये विमानाची वाट पाहत बसले होते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली.

– संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR