नाशिक : नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणार आहे. रविवार दि. १ जून रोजी यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवतील. या वेळी तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, राज्य सरकारमधील महत्त्वाचे मंत्री, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत नाशिकमधील शाहीस्रानाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर होणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरणार असून त्र्यंबकेश्वर येथील तारखा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत.
परंतु अद्याप नाशिकच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या, त्यामुळे साधू-महंतांमध्ये नाराजी होती. हीच नाराजी दूर करण्यासाठी रविवारी बैठक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ ते २ या वेळेत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती असणार आहे.