नागपूर : राज्यात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि शेतक-यांच्या प्रश्नावर दोन दिवस चर्चा होऊन देखील सरकारने उत्तर दिले नाही. चर्चा झाल्यावर सबंधित मंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना दुस-या आठवड्याचे कामकाज संपूनही सरकारने उत्तर न दिल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात निंदा व्यंजक प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, विधानसभा अध्यक्षांकडे सरकारविरोधात प्रस्ताव मांडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे यावर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर, दुसरीकडे याच मुद्यावरून वडेट्टीवार आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टी, दुष्काळ व अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांना तातडीने मदत करण्याबाबत ११ डिसेंबर रोजी सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम १०१अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली. राज्यात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर पडलेला दुष्काळ व त्यानंतर अवकाळी पाऊस एकाच वर्षात अशा एकापेक्षा एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या असताना, अद्याप शेतक-यांना मदत मिळालेली नाही. पीक विमा कंपन्यांच्या मुजोरपणामुळे शेतकरी पीक विम्यापासूनही वंचित राहिला आहे. याबाबत तातडीने रोख मदत जाहीर करण्याची आवश्यकता असताना चर्चेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली. विधानसभेच्या प्रचलित प्रथा व परंपरेनुसार या प्रस्तावावर सभागृहात चर्चा संपल्याबरोबर संबंधित विभागाच्या मंत्रिमहोदयांनी त्यास ठोस उत्तर देणे अपेक्षित असते.
तथापि, सदर प्रस्तावावर चर्चा होऊन चार दिवस उलटले असून शेतकरी हवालदिल झालेला असतानाही आजमितीस शासनाकडून कोणतेही उत्तर सभागृहास देण्यात आलेले नाही अथवा कोणतीही मदत नुकसानग्रस्तांना करण्यात आलेली नाही. यावरून शेतक-यांप्रति शासनाच्या असलेल्या उदासिनतेचा हे सभागृह या ठरावाद्वारे तीव्र निषेध करीत आहे, असे वडेट्टीवारांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले.