23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रअपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना काँग्रेसचा पाठिंबा

अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना काँग्रेसचा पाठिंबा

कोल्हापूर : बंडखोर उमेदवारांच्या माघारीचा दिवस कोल्हापुरात अधिकृत उमेदवाराच्या माघारीने गाजला आहे. काँग्रेसच्या मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे. आधी उमेदवार दिला, त्याला विरोध केला म्हणून त्याला बदलून मधुरिमाराजेंना उमेदवारी दिली होती. त्यांनीही ऐन वेळेला माघार घेत सतेज पाटलांची कोंडी करून ठेवली आहे. आता सतेज पाटलांपुढे राजू लाटकर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. यावरून भाजपा टोले हाणत आहे.

अशातच काँग्रेसचे आधीचे उमेदवार राजू लाटकर यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेसला नाही म्हणायला या मतदारसंघातून आशेचा किरण दिसत आहे. आता सतेज पाटील, काँग्रेसची मंडळी काय निर्णय घेतात, लाटकर यांना पाठिंबा देऊन झाले गेले विसरून त्यांचा प्रचार करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लाटकर यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. सतेज पाटलांनी आपल्याला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी मी त्यांची भेट घेणार असल्याचे लाटकर यांनी म्हटले आहे. मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता आहे. बंटी पाटील माझे नेते होते. आहे आणि राहणार आहेत, अशा शब्दांत लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यामुळे बंटी पाटलांनी राजू लाटकर यांना पाठिंबा दिला तर त्यांना प्रेशर कुकर या चिन्हावर प्रचार करावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस गायब झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक यांनी लगावला आहे. सतेज पाटलांनाही प्रचार काळात विरोधकांकडून या झालेल्या नामुष्कीच्या टीकांना सामोरे जावे लागणार आहे. यातून सावरण्यासाठी सतेज पाटलांनी कार्यकर्त्यांकडे एका दिवसाचा अवधी मागितला आहे. मंगळवारी किंवा बुधवारी ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR