हैदराबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी तेलंगणामध्ये निवडणूक दौ-यावर आहेत. गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी त्यांनी आंबटपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान राहुल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी जनतेचा जितका पैसा लुटला आहे, तितका पैसा काँग्रेस सर्वांना परत करेल.
राहुल गांधी म्हणाले की महिला राज्याच्या भविष्याची काळजी घेतात. आमच्या मुलांची काळजी घेतात. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपये पाठवले जातील. १००० रुपयांचा सिलिंडर ५०० रुपयांना मिळणार आहे. महिलांना सार्वजनिक बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यांच्या प्रवासासाठी ५०० ते १००० रुपये वाचणार आहेत. अशा प्रकारे महिलांना दरमहा ४००० रुपयांचा लाभ मिळणार आहे. याआधी बुधवारीही राहुल यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला होता. कालवकुर्तीमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते म्हणाले की मी नरेंद्र मोदी नाही. जेव्हा मी वचन देतो तेव्हा मी ते पूर्ण करतो.
ओबीसी मुख्यमंत्री करू
भाजपचे नेते इथे येऊन सांगतात की आम्ही ओबीसी मुख्यमंत्री करू. अरे भाई! इथे तुम्हाला २% मते मिळतील, मुख्यमंत्री कसा बनवणार? केसीआर आधी मुख्यमंत्रिपदाला बाय-बाय म्हणतील, त्यानंतर त्यांना जनतेच्या लुटलेल्या पैशावर प्रश्न विचारले जातील.