बीड : ऑक्टोबर २०२४ मध्ये वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी ५ हजार रूपयांची लाच घेताना जालना एसीबीच्या जाळ्यात अडकला. निलंबनानंतर पुन्हा रूजू होताच त्याच हवालदाराने पुन्हा एकदा वाळू माफियाला पळून जाण्यासाठी मदत केली. हा प्रकार लक्षात येताच त्याला सह आरोपी करून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शनिवारी हा प्रकार घडला. आता त्याचे पुन्हा एकदा निलंबन केले होणार आहे.
रामप्रसाद शिवनाथ कडूळे(३६) असे आरोपी हवालदाचे नाव असून सध्या तो पोलिस मुख्यालयात आहे. ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजता नाथापूर शिवारातील सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात होता. ही माहिती मिळताच परिविक्षाधिन उपअधीक्षक पुजा पवार यांनी पथक पाठवून कारवाई केली. यात एक जेसीबी व चालक पकडला होता. तर इतर चौघे फरार झाले होते. यात गोरख दिलीप काळे या वाळू माफियाचाही समावेश होता.
पिंपळनेर पोलिसांनी याचा तपास करत असताना गोरख काळे याला पकडले. त्याचा मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात कडूळे आणि काळे यांच्या संवादाच्या काही कॉल रेकॉर्डिंग सापडल्या. त्या जप्त करून त्याचा अहवाल पवार यांनी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना पाठविला. त्यांची मंजूरी येताच कडूळे याला सह आरोपी करून शनिवारी अटक करण्यात आले. या प्रकाराने पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले आहेत.