मुंबई : देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती पण त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक कर भरतात त्यांनाच मतदानाचा अधिकार असावा अशी भूमिका या लोकांची होती पण डॉ. आंबेडकरांनी तो झुगारून लावला व मतदानाची ताकद सर्वसामान्यांना दिली. काँग्रेसची सत्ता असताना संविधानाला अबाधित ठेवले गेले पण मागील ९.५ वर्षांत संविधानाचे तीन-तेरा वाजवले, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने संविधान दिनाच्या निमित्ताने दादरच्या बी. एन. वैद्य सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संविधानाच्या एक लाख प्रतींच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यापूर्वी राजगृह ते दादर संविधान दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे चेअरमन राजेश लिलोठीया, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदी उपस्थित होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन पटोले पुढे म्हणाले की, भाजपाने लोकशाहीचे चारही स्तंभ कमजोर केले आहेत. काँग्रेसने मात्र लोकशाहीच्या या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य कायम ठेवले होते. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य भाजपा सरकारने हिरावून घेतले आहे, प्रशासकीय व्यवस्थाही धोक्यात आली आहे. उच्च पदावरील अधिकारी वढरउ च्या माध्यमातून निवडले जातात पण आता भाजपा सरकार आरएसएस विचारसरणीच्या मुलांना थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्त करत आहे. न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप केला जात आहे, न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्येही केंद्र सरकारची मनमानी चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा रथ भाजपाने मागे आणला आहे.
संविधान रक्षणासाठी एकत्र येणे आवश्यक
आता शांत बसून चालणार नाही, संविधान रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे. कालपर्यंत काही उद्योग खाजगीकरण केले जात होते पण आता जिल्हा परिषदांच्या शाळांचेही खाजगीकरण केले जात आहे. भाजपा सरकार आता शिक्षणाचा हक्कही काढून घेत आहे. गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवण्याचे भाजपाचे हे षडयंत्र आहे.
शहीद वीरांना वाहिली आदरांजली
एक लाख संविधान प्रती वितरण शुभारंभ व गौरव सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. त्याचे वाचनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ हत्तीअंबिरे व कचरू यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या पूर्वी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली.