लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे. यासाठी मान्यता मिळालेल्या २५.४७ कोटी रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात १ कोटीचा निधी चालू वर्षासाठी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार धिरज देशमुख यांनी पुढाकार घेतला होता.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या रुग्णालय उभारणीसाठी निधी मिळावा यासाठीही आमदार श्री. धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील होते. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला आता चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. त्यांना उपचार घेण्यासाठी शहरात येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आमदार धिरज देशमुख यांनी महाविकास आघाडी बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.