धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून बुधवारी रात्री सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मे महिण्यातच हजेरी लावली होती. त्यामुळे शेतक-यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या.
सध्या खरिपातील सोयाबीन पिक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा शेंगा भरण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मोठी धरणे, साठवण तलावात आणखी पाणीसाठी होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. धाराशिव शहरामध्ये भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदण्यात आलेले असून संततधार पावसाने शहरातील सर्व रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

