नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२३ मध्ये सुरू झालेला टेक उद्योगातील कर्मचारी कपातीचा टप्पा संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. २०२४ मध्येही टेक उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरूच ठेवली आहे. आता बहुतेक कंपन्या सायलेंट लेऑफद्वारे लोकांना घरी पाठवत आहेत.
या वर्षी जुलै अखेरपर्यंत सुमारे १ लाख लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. जुलै महिन्यातच ३४ टेक कंपन्यांनी सुमारे ८००० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. इंटेल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपन्यांनीही नोक-या कमी करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. इंटेलने १५ हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये जगभरातील ३८४ कंपन्यांमधून १,२४,५१७ कर्मचा-यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. इंटेलने अलीकडेच १५ हजारांहून अधिक कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. १० अब्ज डॉलर्सची बचत करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून कंपनी आपल्या कर्मचा-यांमध्ये १५ टक्के कपात करेल. कंपनीच्या महसुलात मोठी घट झाली आहे.
दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टनेही गेल्या २ महिन्यांत सुमारे १००० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. जगातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे.
सॉफ्टवेअर कंपनी ‘युकेजी’ने सुमारे २२०० कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. कॅलिफोर्निया-आधारित वित्तीय व्यवस्थापन सॉफ्टवेअर कंपनी ’इनट्यूट’ने देखील १० टक्के कर्मचारी कमी केले आहेत आणि सुमारे १८०० लोकांना घरी पाठवले आहे.
ब्रिटीश कंपनी डायसनने देखील वाढती स्पर्धा आणि पुनर्रचनेचे कारण देत १००० लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे जगभरात १५ हजार कर्मचारी आहेत. दुसरीकडे, रशियन सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीने अमेरिकेतील बंदीनंतर आपले कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात
भारतातील अनेक कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कर्मचारी कपात करण्यात आली आहे. यापैकी बेंगळुरू स्टार्टअप रेशामंडीने आपल्या ८० टक्के कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. ‘एक्स’चे प्रतिस्पर्धी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ने देखील भारतात आपले कामकाज बंद केले आहे. ‘अनअकॅडमी’ने २५० कर्मचारी, ‘वेकूल’ने २०० कर्मचारी, ‘पॉकेटएफएम’ने 200 कर्मचारी, ‘बंगी’ने २०० कर्मचारी आणि ‘हंबल गेम्स’ने आपल्या सर्व कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करु शकतात. अगोदरच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.