22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत दादा की ताई?

बारामतीत दादा की ताई?

डबल ढोलकीवाल्यांची पंचाईत

बारामती : प्रतिनिधी
बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आता लढत निश्चित झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता सुप्रियाताई की अजितदादा, याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तटस्थ राहणारे आणि दादा आणि ताईंकडे ये-जा करणारे चांगलेच कात्रीत सापडले आहेत.

खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपची आणि राष्ट्रवादीची सम-समान ताकद आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला हा मतदारसंघ अवघ्या काही मताधिक्याने गमवावा लागला. हडपसर विधानसभा मतदारसंघ मागच्या वेळेस भाजपकडे होता, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे त्याठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या मतदारसंघातील काही नेते अजितदादांकडे गेले तर काही शरद पवारांबरोबर राहिले.

त्यामुळे बहुतांश पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका लढवण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते अद्यापही सुप्रिया सुळे आल्या की त्यांच्याबरोबर आणि अजित पवार आले की त्यांच्याबरोबर असल्याचे चित्र आत्तापर्यंत पाहायला मिळत आले आहे. आता बारामती आणि शिरूर मतदारसंघांमध्ये लोकसभेचा प्रचार जोमाने सुरू झालेला आहे. त्यामुळे तटस्थ न राहता कोणती तरी एक बाजू पकडून प्रचाराच्या कामाला लागणे क्रमप्राप्त झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR