नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली एक्झिटने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास अन्वेषण विभागाने (एएआयबी) हाती घेतला आहे.
बारामतीत अपघातग्रस्त झालेले विमान व्हीएसआर कंपनीकडून चालवले जाते. तपास करणारे एएआयबीचे अधिकारी दिल्लीतील व्हीएसआर कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. एएआयबीच्या अधिका-यांनी कंपनीतील अनेक कागदपत्रे सील केली आहेत. दिल्लीतील व्हीएसआरच्या कार्यालयात एएआयबीचे तीन अधिकारी पोहोचले होते. व्हीएसआर कंपनीचे मालक अपघात झाला, त्याच दिवशी माध्यमांसमोर आले होते. विमानात कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. आमची सगळी विमाने योग्य स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांची सेवा बंद करण्याचा प्रश्नच येत नाही असे कॅप्टन व्ही. के. सिंह यांनी सांगितले.
सिंह हे व्हिएसआर व्हेंचर्सचे मालक आहेत. ते आणि त्यांचा मुलगा मिळून कंपनी चालवतात. दोघेही पायलट आहेत. व्हीएसआर कंपनीच्या कार्यालयात पोहोचलेल्या एएआयबीच्या अधिका-यांनी कंपनीच्या गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्याची ओळख विचारली. त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्याला आधार कार्ड दाखवण्यास सांगण्यात आले. तपासात सहकार्य केलेस, तर तुला काहीही होणार नाही, असे अधिका-यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितले. मात्र तरीही त्याने आपल्याला काहीही माहीत नसल्याचा दावा केला.
कार्यालयातील कर्मचारी गायब
एएआयबीचे अधिकारी व्हिएसआर अॅव्हिएशनच्या महिपालपूर येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयातील अनेक जण अचानक गायब झालेले आढळून आले. विशेष म्हणजे सकाळी कार्यालयात पोहोचलेले अनेक जण एएआयबीचे अधिकारी पोहोचले तेव्हा गायब झाले होते.
कार्यालयाचे दार बंद करून चौकशी
सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केल्यावर अधिकारी आत पोहोचले. त्यावेळी कार्यालयातील दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. आत कोणी नसताना दरवाजा आतून बंद कसा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संशयदेखील वाढला. यानंतर थोड्या वेळानं अधिकारी आत पोहोचले. त्यांनी कार्यालयातील अनेक फाईल्स सील केल्या आहेत. कंपनीने अद्याप तरी यावर कोणतीही माहिती दिलेली नाही.

