नवी दिल्ली/ मुंबई : महागाई प्रत्येक गोष्टीत अस्मानाला जाऊन भिडत असून थांबण्याचे किंबहुना कमी होण्याचे नावही दिसून येत नाही. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून आता डाळींच्या दरानेदेखील उच्चांक गाठला आहे. बाजारपेठेत तूर डाळ व हरभरा डाळींचे दर महागले आहेत.
एकीकडे बाजारात डाळींचा तुटवडा नाही असे म्हटले जात आहे पण ‘सिस्टीमच्या’ दुर्लक्षामुळे भाववाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. मागील हंगामात तूर डाळीच्या उत्पादनाला फटका बसला पण सध्या कारवाई थांबल्याने बडे साठेबाज हात धुऊन घेत असल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत. नगर जिल्ह्यात नगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर, नेवासा, शेवगाव आदी तालुक्यात कमी पावसामुळे यंदा उत्पादन कमी आहे. गुजरात राज्यातील व्यापा-यांनी तूर डाळ जास्त प्रमाणात खरेदी केल्याचे व्यापा-यांनी सांगितले. बाजारात तुटवडा नाही; पण साठेबाजीमुळे भाव वाढत असल्याचे व्यापा-यांचे मत आहे. व्यापा-यांनी सांगितले की, तुटवड्यामुळे ७ वर्षांपूर्वी तूर डाळीला किलोमागे २०० रुपये मोजावे लागले होते. आता तीच परिस्थिती आहे. २०१२ मध्येही तूर डाळ २०० रुपयांपर्यंत गेली होती.
देशात तुरीचे पीक केवळ खरिप हंगामात घेतले जाते. या पिकात ९.३२ टक्क्यांची तूट होतीच, मात्र अनियमित पावसामुळे पीक मोठ्या प्रमाणावर खराब होऊन प्रत्यक्ष उत्पादनात मोठ्या तुटीची चिन्हे आहेत. दुसरीकडे, कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये व टोमॅटो ६० रुपये प्रति किलोवर गेला असून शंभरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शिवाय सर्वच भाज्या किमान ८० रुपये किलो झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
डाळींचे दर
तूर डाळ १७० रु.
उडीद डाळ १३० रु.
मूग डाळ १२० रु.
मठ डाळ १३० रु.
हरभरा डाळ ८२ रु.
सरकारी डाळ ७० ने विक्री?
हरभरा डाळीची सर्वांधिक विक्री होत असते. त्यानंतर तूर डाळीला मागणी असते. सरकारी डाळ सध्या मॉलमध्ये विक्रीला ठेवण्यात आली आहे. ६० रुपये किलोने हरभरा डाळ विकत आहे. काही लोक हीच डाळ खरेदी करून बाजारात ७० ने विक्रीचा प्रयत्न करीत असल्याचे व्यापारी म्हणत आहेत.
अवकाळीचा डाळीवर परिणाम
डाळींमध्ये सर्वांत तूर डाळ महाग असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत किलोमागे २० रुपयांनी, तर वर्षभरात ४० रुपयांनी तूर डाळ महागली. मागील हंगामात अवकाळी पावसाने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. अशीच परिस्थिती राहिल्यास ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत दर १९० ते २०० पर्यंत जातील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.