नागपूर : रात्रीच्यावेळी शेकोटी पेटवल्याने घराला आग लागल्याची घटना नागपूर शहरात घडली. या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या आगीत देवांश रणजित उके (वय ७) आणि प्रभास रणजीत उके (वय २) या दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हजारी पहाड सेमिनरी हिल परिसरात ही घटना घडली.
गुरुवारी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या सुमारास उके कुटुंबाच्या झोपडीला आग लागली. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे, त्या समोरच ही झोपडी आहे. या झोपडीत तीन भावंड होती आग लागल्याने मोठी मुलगी ओरडत बाहेर आल्याने ती बचावली. थंडी असल्यामुळे या मुलांनी घरातच शेकोटी पेटवली, त्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी या मुलांची आई शेजारी गेली होती तर वडील कामाला गेले होते. या घटनेनंतर आईने आरडाओरडा सुरु केल्याने शेजारचे लोक मदतीसाठी धावले मात्र, तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते.